पुण्यात MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या सलग ११ दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलकांशी मध्यरात्री चर्चा करून ही घोषणा केली. या चर्चेत आमदार रोहित पवार आणि आंदोलनाचे प्रतिनिधी सहभागी होते.
मंत्री शिवेंद्रसिंह राजे म्हणाले की, MPSC आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार चौकशी समितीच्या सचिव पदी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
### नवीन चौकशी समितीची रचना:
राज्य सरकारने 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे, तिला 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अध्यक्ष: मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती न्या. दिलीप भोसले
सचिव: ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे - सध्या FDA आयुक्त म्हणून कार्यरत
इतर सदस्य: माजी IPS अधिकारी लक्ष्मी गौतम, माजी न्यायाधीश धनेश पाटील आणि माजी न्यायाधीश पी. डी. नाईक यांचा समावेश असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
समिती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची सत्यता तपासणे, आरोपांची पडताळणी करणे आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींबाबत शिफारशी करणार आहे.
दरम्यान, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची प्रमुख मागणी होती. सरकारने दिलेल्या तोडग्यानुसार ते चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर राहणार आहेत.
तुकाराम मुंडे हे त्यांच्या कडक आणि पारदर्शक कार्यशैलीसाठी ओळखले जातात, त्यामुळे या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.

Post a Comment
0 Comments