मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित घटक, सफाई कामगार आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला भेट नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कामगार संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, काही आंबेडकरी वस्त्यांमध्ये आयुक्तांच्या निषेधाचे फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसह मुंबईकरांच्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट मागितली होती. मात्र, नियोजित भेटीपूर्वीच ती रद्द करण्यात आल्याचा दावा कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे.या प्रकरणाच्या निषेधार्थ म्युनिसिपल कामगार संघ आणि वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.म्युनिसिपल कामगार संघ ही महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असून, दहा हजारांहून अधिक कर्मचारी संघाचे सभासद असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रतिनिधींना भेटीची संधी न मिळाल्याने कामगार वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, आयुक्त अश्विनी भिडे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना भेट का नाकारली, याबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळेच या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वंचित घटक आणि सफाई कामगारांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवाद साधणे आवश्यक असल्याची भूमिका कामगार संघटनांकडून मांडण्यात येत आहे. भेट नाकारल्याच्या आरोपामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणी आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे आणि कामगार प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments