Type Here to Get Search Results !

जागतिक ख्यातीचे ब्रिटिश ईतिहास संशोधक सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जन्म दिन २० आँगस्ट.

 


सर जेम्स प्रिन्सेप (२० आँगस्ट १७९९ - २२ एप्रिल १८४०)




भारतातील ऐतिहासिक संघर्ष हा कायमच श्रमण विरुध्द ब्राम्हण असा राहिलेला आहे.अस डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नमुद करतात.यातुनच ब्राम्हण म्हणजेच वैदिक संस्कृतीच्या लेखकांना कमालीची विकृतता दाखवित भारताचा बौध्द धम्म तथा बौध्द वैभवशाली साम्राज्य याचा ईतिहास विकृत केला.बुध्दाला विष्णुचा नववा अवतार ठरविला.परंतु जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश संशोधकामुळे बूध्द हा ऐतिहासिक पुरुष आहे.हे संदर्भासह सार्‍या जगाला सिध्द करुन दिले गेले.अशा चिकित्सक वृत्तीच्या महान ईतिहास संशोधकाच्या जन्म दिनी विनम्र अभिवादन.

जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शो

हेस्टिंग्जच्या काळामध्ये हिंदुस्तानात भरपूर पैसा जोडून १७८७ मध्ये इंग्लंडात परतलेल्या जॉन प्रिन्सेप ह्यांना एकूण सात मुलगे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरभरतीमध्ये ओळखी, वशिले आणि पुतणेगिरी भरपूर होती. तिचाच लाभ घेऊन सातही प्रिन्सेप भाऊ हिंदुस्तानात आले. त्यांपैकी दोघांनी विशेष कर्तबगारी दर्शविली. एक सर हेन्री थॉबी प्रिन्सेप आणि दुसरा म्हणजे जेम्स प्रिन्सेप.१७९७ साली जन्मलेला जेम्स १८१९च्या सप्टेंबरात हिंदुस्तानात पोहोचला आणि १८३८च्या ऑक्टोबरात प्रकृतीच्या कारणासाठी परत जाईपर्यंत तो हिंदुस्तानातच राहिला.परतल्यानंतर काही महिन्यातच मेंदूच्या काही विकाराने एप्रिल १८४० साली त्याचा मृत्यु झाला. हिंदुस्तानातील एकूण १९ वर्षांच्या वास्तव्यात अनेक क्षेत्रामध्ये त्याने आपल्या बुद्धीची आणि सततोद्योगाची चुणूक दाखविली. आज त्याची आपल्याला उरलेली मुख्य आठवण म्हणजे ब्राह्मी लिपी, जी हिंदुस्तानात संपूर्ण विस्मरणात गेली होती, तिचे पुनरुज्जीवन करून हिंदुस्तानच्या जवळजवळ अज्ञात झालेल्या प्राचीन इतिहासावर प्रकाशझोत टाकणे हे काम त्याने मुख्यत्वेकरून १८३४ ते १८३८ ह्या काळात केले. ह्या कामात प्रिन्सेपला महत्त्वपूर्ण साहाय्य हिंदुस्तानभर वेगवेगळ्या जागी आपापल्या नोकर्‍या करणार्‍या अनेक उत्साही ब्रिटिश अधिकार्‍यांनी केले तसेच अनेक एतद्देशीय पंडितांचा देखील ह्या कार्याला वेळोवेळी हातभार लागला. ह्या सर्व प्रयत्नांना एका दिशेने चालू ठेवणे आणि ह्या प्रयत्नांचे नेतृत्व करणे हे जेम्स प्रिन्सेपचे प्रमुख काम आणि अशा अर्थानेच त्याला ’ब्राह्मी लिपीचा संशोधक’ असे मानले जाते. १८२२ साली रोझेटा लेखाचे वाचन करून शांपोलियॉंने इजिप्तच्या प्राचीन इतिहासाचे दालन उघडले तशाच प्रकारचे कार्य प्रिन्सेप आणि त्याच्या सहकार्‍यांनी भारताच्या प्राचीन इतिहासासाठी केले. ब्राह्मी आणि त्याबरोबरच वायव्य भागात विशेष प्रचलित असलेल्या खरोष्ठी लिपीच्या वाचनामुळे हिंदुस्तानभर पसरलेल्या शेकडो-हजारो शिलालेखांचे आणि ठिकठिकाणी सापडणार्‍या जुन्या नाण्यांचे वाचन शक्य झाले आणि प्राचीन भारताच्या इतिहासाचे अनेक दुवे पुन: जोडणे शक्य झाले.अशोक, चन्द्रगुप्त, विक्रमादित्य असे प्रतापी सम्राट आणि त्यांचे कार्य, इतकेच नव्हे तर त्यांची नावेदेखील हिंदुस्तानात संपूर्ण विस्मरणात गेली होती. अशोकाचे नाव केवळ विष्णुपुराणातील एका यादीमधल्या त्रोटक उल्लेखापुरते मर्यादित होते पण त्याच्याबद्दल अन्य काहीच माहीत नव्हते. गुप्त सम्राटांचीही आठवण पूर्ण नष्ट झाली होती. अशा नष्टप्राय झालेल्या स्मृति त्याने पुनः जागवल्या हे जेम्स प्रिन्सेपचे भारतावर मोठेच उपकार आहेत. हे कार्य त्याने आणि त्याच्याप्रमाणेच हिंदुस्तानभर पसरलेल्या हौशी आणि उत्साही संशोधकांनी कसे केले ह्याचा घटनाक्रम Asiatic Society of Bengalच्या १८३४ ते १८३८ सालांच्या जर्नल्समध्ये छापल्या गेलेल्या अनेक शोधनिबंधांवरून जुळवता येतो. त्या घटनाक्रमाचा संक्षिप्त आढावा ह्यापुढे दिलेला आहे.इतके मूलगामी संशोधन करणारा जेम्स प्रिन्सेप कोणी गाढा विद्वान प्राध्यापक असावा असे वाटेल पण तो होता एक सर्वसामान्य तरुण. उपजीविकेपुरती नाणेपारखीची विद्या लंडनमध्ये शिकल्यावर त्याच क्षेत्रातील नोकरी करण्यासाठी १८१९मध्ये वयाच्या

विसाव्या वर्षी तो हिंदुस्तानात आला. १८३०पर्यंत तो बनारसमधील टांकसाळीत प्रमुख धातुपारखी (Assay Master) ह्या जागेवर होता आणि तेथेच त्याने स्थापत्य, रसायनशास्त्र, नाणेव्यवस्था सुधारणे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य करून आपल्या चतुरस्र बुद्धीचा पुरावा दिलाच होता. बनारसची टांकसाळ कंपनी सरकारने १८३० साली बंद केल्याने जेम्स कलकत्त्याच्या टांकसाळीत प्रमुख धातुपारखी असलेल्या होरेस हेमन विल्सन ह्यांच्या मदतनिसाच्या जागेवर आला. विल्सन ह्यांनी हिंदुस्तानातील वास्तव्यात संस्कृत भाषा उत्तम शिकून घेतली होती आणि आद्य संस्कृत अभ्यासक विल्यम जोन्स ह्यांनीच सुरू केलेल्या Asiatic Society of Bengalचे सचिवपदही त्यांच्याकडे होते. त्यांनी जेम्सला प्राच्यविद्येमध्ये रस घ्यायला मार्गदर्शन केले आणि त्याला Asiatic Societyचे सदस्यत्वही दिले. १८३२मध्ये विल्सन इंग्लंडात परतले आणि कालान्तराने ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत विषयातील ’बोडेन प्रोफ़ेसर’ हे स्थान भूषविणारे ते पहिले संस्कृत अभ्यासक झाले. त्यांनी मोकळी केलेली टांकसाळीतील जागा आणि Asiatic Societyचे सचिवपद ही दोन्ही स्थाने त्यांच्याच सूचनेवरून जेम्सला

मिळाली. तो स्वत: १८३८ साली इंग्लंडात परतेपर्यंत त्याने ह्या दोन्ही जबाबदार्‍या सांभाळल्या. आर्थिकदृष्टया नाजूक अवस्थेत असलेल्या सोसायटीला सरकारी सूत्रांचा फारसा पाठिंबा नसतानाही त्याने तगविले आणि विद्येच्या क्षेत्रात तिला मानाचे स्थान मिळवून दिले. १८३८ साली प्रकृतीच्या कारणाने तो इंग्लंडला परतला आणि तदनंतर लवकरच १८४०च्या एप्रिल महिन्यात मेंदूच्या विकाराने वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी त्याचा अंत झाला. (योगायोग असा की शांपोलियॉंलाही ४२ वर्षांचे अल्प आयुष्यच मिळाले होते.)*


१८३० सालापर्यंत हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात कंपनीची प्रत्यक्षाप्रत्यक्ष सत्ता पोहोचली होती. कंपनीच्या नोकरांपैकी काही जणांना हा अपरिचित देश आणि त्याची प्राचीन संस्कृती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असे आणि अशा हौसेपोटी पुष्कळजण आपला फावला वेळ आणि पैसा खर्च करून नाना प्रकारचे अभ्यास करीत असत. काही जणांना नाणी गोळा करणे, शिलालेखांचे ठसे घेणे, जुन्या मंदिरांचे, राजवाडे-किल्ल्यांचे संशोधन करणे असे छंद असत. त्यांच्या संशोधनाचे फलित ते Asiatic Societyकडे संग्रहालयात जमा करण्यासाठी पाठवून देत असत. अशा मार्गाने १८३४ पर्यंत सोसायटीकडे अनेक संग्राह्य गोष्टी जमा झाल्या होत्या आणि न समजणार्‍या लिपींमध्ये लिहिलेल्या शिलालेखांचे ठसे, तशाच प्रकारची शेकडो जुनी नाणी त्यांमध्ये होती.*


भारतीय विद्वानांपैकी फार थोडया लोकांना असले काही संशोधन करण्याचा नाद होता आणि ब्राह्मीसारख्या काही लिपींचे ज्ञान तर त्यांमध्ये कोणाकडेच नव्हते. विद्या म्हणजे मुख्यत्वेकरून घटपटादि चर्चा अशीच बहुतेक एतद्देशीय पंडितांची समजूत होती. त्याचा परिपाक म्हणजेच असे शिलालेख, नाणी हा काही अभ्यासाचा विषय असू शकतो आणि हिंदुस्तानच्या इतिहासावर त्यातून प्रकाश टाकता येतो हे त्यांच्या ध्यानीही नव्हते आणि कोणाला अशी रूची असलीच तरीही एव्हांना राज्यतन्त्र परकीयांच्या ताब्यात गेल्यामुळे राजाश्रय आणि आधार मिळणे दुरापास्त झाले होते.*


अशा वातावरणात जेम्स Asiatic Societyमध्ये आला. पुस्तकी पुरातत्त्वविद्येपेक्षा जागेवर जाऊन उत्खनन करून वस्तुनिष्ठतेकडे वळण्याचा काळ आता आला होता.*


१८३०च्या दशकाच्या सुरुवातीस अलेक्झॅंडर बर्न्स (Bokhara Burnes) ह्याने बोखारापर्यंत पायी प्रवास करून त्या भागाची बहुमूल्य माहिती गोळा केली होती. तेथील ग्रीक, बॅक्ट्रियन आणि इंडो-स्किथियन राजवटींची शेकडो नाणी गोळा करून त्याने ती Asiatic Societyकडे सुपूर्द केली होती. त्यांमधून उल्लेखिलेल्या काही राजांची नावे ग्रीक लिखाणांमधून आधीच माहीत होती. त्या नाण्यांचा अधिक अभ्यास करून जेम्सने ’कनिष्क’ ह्या राजाचे नाव जगापुढे आणले.*


Journal of the Asiatic Society of Bengal, (ह्यापुढे JASB) Vol. III 1834 येथील मार्च महिन्याच्या भागाच्या पृ.१०५ वर ले.टी.एस.बर्ट ह्या हौशी अधिकार्‍याने सोसायटीकडे पाठविलेले एक वर्णन आणि लेखांचे ठसे छापण्यात आले आहेत. अलाहाबादमध्ये गंगेकाठी जो किल्ला आहे तेथे जमिनीवर भग्नावस्थेत पडलेल्या एका स्तंभाचे आणि त्यावरील काही शिलालेखांचे वर्णन त्यामध्ये आहे. असे दिसते की आठवत होते त्या काळापासून हा स्तंभ तेथे उभा होता आणि शाहअलम बादशहाच्या अम्मलाच्या ४६व्या वर्षाच्या पुढेमागे किल्ल्याची डागडुजी इंग्रज अधिकार्‍यांनी केली तेव्हा किल्ल्याच्या भिंतीच्या वाटेत येतो ह्या कारणासाठी तो जागेवरून काढून मोडक्या अवस्थेत शेजारीच टाकून देण्यात आला होता. स्थानिक जनता स्तंभाला ’भीमाची लाट (लाठ/लाठी) किंवा गदा’ अशा नावाने ओळखत होते. गोल आकाराच्या ह्या स्तंभाच्या पायाचा आणि मस्तकाचा व्यास अनुक्रमे ३ फूट २-१/४ इंच आणि २ फूट २ इंच, तसेच परिघ अनुक्रमे १० फूट १ इंच आणि ६ फूट ६-१/४ इंच होता. मस्तकावर एका बसलेल्या प्राण्याचे शिल्प असावे असे दिसत होते, यद्यपि तो भाग उपलब्ध नव्हता. प्राण्याचे शिल्प जागेवर धरून राहण्यासाठी लोखंडी आधार वापरला असावा असे सुचविणारे छिद्र मस्तकाच्या मध्यावर दिसत होते. स्तंभाची लांबी ३७ फूट असून ती जवळजवळ दिल्लीच्या फिरोजशाह कोटला येथील लाटेइतकीच होती. स्तंभाचे वजन १७ टन १२ हंड्रेडवेट किंवा ४९३ मण असावे असाही अंदाज बर्टने वर्तविला होता.*

(सुलतान फिरोझशाह हा मोहम्मद तुघलकाच्या नंतर दिल्लीचा सुलतान झाला आणि १३५१ ते १३८८ ह्या काळात तो सत्तेवर होता. दिल्लीमध्ये यमुनेच्या काठी फिरोझशाह कोटला म्हणून सुलतान फिरोझशाहने बांधलेला किल्ला आहे आणि सुलतानाने दिल्लीच्या उत्तरेकडे यमुनेच्या काठी असलेल्या खिझराबाद नावाच्या गावातून उचलून आणून येथे उभा केलेला एक स्तंभ आहे. त्यावरही अज्ञात लिपीमध्ये लिहिलेला एक लेख होता आणि तो कोणासही वाचता येत नव्हता.)अलाहाबाद किल्ल्यातील स्तंभावर एकूण चार लेख होते. त्यांना क्र.१, क्र.२, क्र.३ आणि पर्शियन अशी सोईसाठी नावे देता येतील. पर्शियन लेख जहांगिर बादशहाने पर्शियन लिपीत कोरलेला असून तो आणि त्याच्या पूर्वीच्या ८ पूर्वजांची नावे त्यात दिली आहेत. हा लेख क्र.१ लेखाच्या ओळींच्या मधल्या जागेत कोरला गेला आहे.*


बर्टच्या वर्णनावर जेम्स प्रिन्सेपची टिप्पणी पृ. ११४ पासून सुरू होते. चारांपैकी क्र.३ चा लेख देवनागरीमध्ये लिहिलेला असून सर्वात दीर्घ आहे. तरीही त्यामध्ये मुख्यत्वेकरून अनेक नावे आणि तारखाच नोंदविलेल्या असून महत्त्वाचे काहीच दिसत नाही. क्र. २ चा लेख प्रिन्सेपने बनारस संस्कृत कॉलेजच्या पंडितांकडून वाचवून घेण्यासाठी त्या कॉलेजचा कार्यवाह कॅ. ट्रॉयर ह्याच्या हवाली केला आणि तेथील प्रमुख ग्रंथपाल माधव राय ह्यांनी महाबलिपुरम् आणि अन्य स्थानांहून मिळालेल्या लेखांच्या आधारे त्यामधून ’चन्द्रगुप्त',’समुद्रगुप्त’ आणि काही अन्य नावे वाचण्यात, तसेच अन्य बराचसा मजकूर वाचण्यात यश मिळविले. (पृ.११८). गुप्तांच्या प्रतापी घराण्याच्या साम्राज्याचा अशा मार्गाने प्राचीन इतिहासाच्या दालनात पुन:प्रवेश झाला. (ह्या पहिल्या वाचनानंतर अधिक अभ्यासामुळे पुढील काळात वाचनात बरेच बदल झाल्याचे दिसते.) विष्णुपुराणात उल्लेखिलेला नन्दवंशाशी संबंधित चन्द्रगुप्त हाच ग्रीक स्रोतांमधील अलेक्झॅंडरचा समकालीन 'Sandracottus' असावा असा ठोकताळा होताच. तो चंद्रगुप्त आणि अलाहाबाद क्र.२ मधील चंद्रगुप्त हे एकच का वेगळे असा प्रश्न निर्माण झाला. ह्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासाठी अजून काही काळ जायचा होता..*


आपल्या ११४ पृष्ठावरील टिप्पणीत प्रिन्सेपने काढलेले प्रमुख निष्कर्ष असे: अलाहाबाद क्र. १चा लेख स्तंभावर सर्वात प्रथम स्थानी आहे, त्यातील लिपी क्र. २शी मिळतीजुळती आहे तरीही क्र. २मधील लिपी क्र. १च्या लिपीचा पुढील अवतार आहे कारण तिच्यात अक्षरसंख्या अधिक दिसते आणि अक्षरे अधिक सुबक आहेत. ह्या कारणांनी क्र.१चा लेख क्र. २पेक्षा अधिक प्राचीन आहे. त्यातील अक्षरे आणि त्यांच्यात होणारे पाच बदल हे देवनागरीमधील बाराखडीमध्ये दिसतात त्या प्रकारचे आहेत म्हणजेच लेखाची भाषा ही संस्कृत-देवनागरी गटाशी नाते सांगणारी आहे, मग प्रत्यक्ष भाषा कोणतीही असो. विशेष म्हणजे अलाहाबाद क्र.१ आणि दिल्ली कोटला स्तंभाच्या लेखावर सुरुवातीसच येणारी आणि शेजारी चित्रात दाखविलेली पाच अक्षरे अगदी एकसारखीच आहेत म्हणजेच तो एकच मजकूर दोन्ही स्तंभांवर आहे.*


ह्यापुढील महत्त्वाची पायरी म्हणजे JASB Vol.III च्या जून १८३४च्या भागातील रे. डब्ल्यू.एच.मिल, सोसायटीचे उपाध्यक्ष, ह्यांचा निबंध. माधव राय ह्यांच्या सोडवणुकीतील निश्चित वाटणारी अक्षरेच केवळ गृहीत धरून आणि गयेमध्ये सापडलेल्या देवनागरी-संस्कृतमधील एका लेखावरून आधार घेऊन मिल ह्यांनी अलाहाबाद क्र.२चे पुनर्वाचन केले आणि त्यातून पुढील निश्चित वंशावळ उभी केली : सूर्यकुलोत्पन्न राजा गुप्त - त्याचा पुत्र घटोत्कच - त्याचा पुत्र चंद्रगुप्त - त्याची पत्नी लिच्छविकन्या कुमारदेवी - त्यांचा पुत्र समुद्रगुप्त - संहारिकापुत्री (नाव अज्ञात) त्याची पत्नी.*


अलाहाबाद क्र. १च्या वाचनाचे कोडे अद्यापि न सुटलेलेच होते आणि ते सुटायला तीन वर्षे बाकी होती, तरीही त्या दिशेने पुढचे पाऊल बी.एच.हॉजसन ह्यांच्या JASB Vol.IIIच्या ऑक्टोबर १८३४च्या भागातील लेखाने टाकले. हॉजसन हे नेपाळ दरबारात कंपनीचे रेसिडेंट म्हणून कामावर होते आणि जेम्सचा मार्च १८३४मधील निबंध त्यांच्या वाचनात आला होता. तो वाचून त्यांनी सोसायटीस कळविले की ८-१० वर्षांपूर्वी उत्तर बिहारमधील अशाच तीन स्तंभांबाबत त्यांनी सोसायटीला माहिती पुरविली होती. त्यांपैकी एक उत्तर बिहारमध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया नंदनगढ ह्या गावाजवळ होता आणि त्या स्तंभावरील अशाच एका लेखाचा ठसाही त्यांनी सोसायटीकडे पाठविला होता. हिंदुस्तानच्या दूरदूरच्या भागांमध्ये असे हे एकसारखे लेख मिळत होते ह्याचा अर्थ असाच लावता आला असता की ते लेख काही प्रकारच्या देवनागरी-संस्कृतसमान लिपीत आणि भाषेत लिहिलेले असावेत.*


हॉजसन ह्यांची ही टिप्पणी पाहून जेम्सच्या ध्यानात आले अलाहाबाद, फिरोजशाह कोटला आणि लौरिया नंदनगढ - ह्यालाच जवळच्या गावावरून बेटिया लेख असेही उल्लेखिलेले आढळते - ह्या तीनही लेखात साम्य आहे आणि पहिली पंधरा अक्षरे तीनही लेखांमध्ये समानच आहेत. (ही अक्षरे अशी होती:)*


ह्यानंतर JASB Vol.IIIच्या नोव्हेंबर १८३४च्या भागात रे. जे.स्टीवनसन ह्यांचा कार्ल्याच्या लेण्यातील काही लेखांच्या वाचनाचा प्रयत्न असलेला लेख प्रसिद्ध झाला. हा लेख लिहिण्याच्या वेळी JASB Vol.III च्या मार्च १८३४ च्या भागातील अलाहाबाद स्तंभाविषयीचा लेख स्टीवनसन ह्यांच्या पाहण्यात आला होता आणि तो वाचल्यावर त्यांनी अलाहाबाद स्तंभातील पहिल्या १५ अक्षरांचे वाचन करण्याचा प्रयत्न केला (चित्र वर पहा) तो असा: द्वेधारं पिये पिय द्वमोभार्जनेवं. तसेच कार्ल्याच्या लेण्यातील काही लेखांचे त्यांनी केलेले वाचनही त्यांनी सोसायटीकडे पाठविले, अशासाठी की त्याचाही वापर करून अलाहाबाद लेखाचे पूर्ण वाचन सुकर व्हावे. मात्र स्टीवनसन ह्यांच्या ह्या लिखाणाचा व्हावा तसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. (ह्या कार्ल्यातील लिखाणाच्या वाचनाचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी पुण्यातील काही ब्राह्मणांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या ब्राह्मणांना ते लेख वाचता आले नाहीच पण लेख कन्नडमधील असावेत असा तर्क त्यांनी केला. तेव्हा कन्नड जाणणार्‍या काही ब्राह्मणांना विचारून पाहिले. त्यांनी लेख कन्नड नसून तमिळ असावेत असा तर्क लढविला!)*


मधल्या काळत वायव्य भागातून कॉटली, जन. वेन्चूरा अशांसारख्या हौशी संशोधकांनी गोळा केलेल्या इंडो-स्किथियन आणि बॅक्ट्रियन नाण्यांचा ओघ सोसायटीकडे चालूच होता. जेम्सला असे दिसले की त्या नाण्यांपैकी काहींवर अलाहाबाद क्र. २ लेखासारखे शब्द होते. एका नाण्यावर त्याला ’श्रीमद्घवकचो’ असा शब्दही आहे असे वाटले. (हा शब्द वस्तुत: ’श्रीमद्घटोत्कचो’ असा होता, ते नंतर कळले - वर वंशावळ पहा.) काही नाण्यांवरील लेखनात अलाहाबाद क्र. १मधील अक्षरांसारखी अक्षरे त्याला आढळली. ह्या नाणेसंग्रहांच्या अभ्यासामधून त्या भागातील ग्रीक, बॅक्ट्रियन, कुशाण राजवंशातील राजांची नावे कळली. कनिष्काचे नावही अशाच अभ्यासामधून जेम्सच्या हाती लागले.*


हौशी संशोधकांच्या प्रयत्नांनी नवनवे स्तंभ आणि लेख उपलब्ध होतच होते. बिहारमधील रांधिया गावी सापडलेल्या स्तंभावर कोटला, अलाहाबाद आणि लौरिया नंदनगढ स्तंभांवरील लिखाणाची चौथी आवृत्ती मिळाली. सोसायटीकडे येणारी अशी सर्व माहिती एकत्र गोळा करून आणि एकमेकांशी पडताळून त्यातून ह्या लेखांची अज्ञात लिपी सुसूत्रपणे वाचण्याचे जेम्सचे प्रयत्न चालूच होते. ह्याशिवाय हिस्सार आणि फतेहाबाद येथेही स्तंभ सापडले.*


रांधिया स्तंभ. बाखरा स्तंभ.बाखरामधील भग्न मूर्ति*

ह्या सर्वांमध्ये पाटण्याच्या उत्तरेस २५ मैलावरील बाखरा गावानजीक सापडलेल्या प्राचीन अवशेषांची कथा मोठी मनोरंजक आहे आणि जे. स्टीफन्सन ह्यांच्या लेखातून ती JASB Vol.IVच्या जानेवारी १८३५च्या अंकात पृ. १२८-१३८ येथे उपलब्ध आहे. येथे स्टीफन्सन ह्यांना एका प्राचीन आणि संपूर्ण विस्मरणात गेलेल्या नगराच्या विस्तृत अवशेषांमध्ये एक उभा स्तंभ सापडला, ज्याच्या माथ्यावर एक सिंह होता. तेथे वस्ती करून राहिलेल्या एका फकीराकडून इतर संशोधकांना एका पद्मासनासनात बसलेल्या भग्न मूर्तीच्या पायांचा भाग मिळाला आणि त्या भागामध्ये अगदी तळाशी दोन सिंहांच्या प्रतिमांखाली एका ओळीचा एक लेख होता. ह्याच वेळेस योगायोगाने ले. कनिंगहम आणि अन्य सहकारी आपले खाजगी पैसे वापरून सारनाथ येथे उत्खनन करीत होते आणि तेथे त्यांनाही एका शिळेवरती एक लेख मिळाला होता.*


ह्या दोन्ही लेखांच्या प्रती प्रिन्सेपकडे आल्या आणि त्याच्या ध्यानात आले की देवनागरीशी मिळत्याजुळत्या लिपीतील तो एकच लेख दोन्ही ठिकाणी आहे. (वरील चित्र पहा.) तिबेटी भाषेची लिपी ६व्या-७व्या शतकात देवनागरीपासून निर्माण झाली. तिच्याशी तुलना करून आणि तिबेटी ग्रंथांच्या आधारे असे दिसून आले की हा लेख म्हणजे बौद्ध प्रार्थनेमध्ये नेपाळ-तिबेटात सरसहा वापरल्या जाणार्‍या प्रार्थनेचा तो भाग आहे आणि त्याचे वाचन असे आहे ये धर्मा हेतुप्रभवास्तेषां हेतुं तथागत उवाच तेषां च यो निरोध एवं वादी महाश्रमण: ले.अलेक्झॅंडर कनिंगहम, जे पुढे जनरलच्या हुद्दयापर्यंत चढून पुरातत्त्व विभागाचे पहिले डिरेक्टर-जनरल झाले, त्यांची सारनाथ उत्खननाशी संबधित पुढील नोंद वाचण्याजोगी आहे. ते म्हणता.जगत सिंह, बनारसच्या राजाचे दिवाण, ह्यांनी १७९३-९४मध्ये आपला वाडा आणि आपल्या नावाचा बाजार बांधण्यासाठी सारनाथमधील तयार विटा आणि दगड ह्यांची मुक्तहस्ते लूट केली होती ह्याची ही नोंद आहे.अशा मार्गाने सर्व हिंदुस्तानामधून गोळा झालेले शिलालेखांचे ठसे, नाण्यांवरील नावे इत्यादींचा अभ्यास अनेक हौशी संशोधकांनी करून करून आजवर अज्ञात राहिलेल्या लिपीच्या वाचनात काही प्रगती घडवून आणली होती. ह्याचेच फलित म्हणून गुप्त, वाकाटक असे अनेक संपूर्ण विस्मरणात गेलेले राजवंश प्रकाशात येऊन मुस्लिम राजवटीपूर्वीच्या आतापावेतो अज्ञात असलेल्या हिंदुस्तानचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते.जून ७, १८३७ ह्या दिवशी जेम्स प्रिन्सेपने सोसायटीपुढे एक महत्त्वाचा निबंध वाचून दाखविला. भिलसा (विदिशा) गावाजवळ सांची स्तूपाचे भग्न अवशेष होते आणि हौशी संशोधक त्यांचा अभ्यास करीत होते. कॅ. एडवर्ड स्मिथ ह्यांनी त्या अवशेषांमधून काही लेख शोधून त्यांचे ठसे सोसायटीकडे पाठविले होते. कॅ. स्मिथ ह्यांनी क्र. १ असा क्रमांक दिलेला लेख हा स्तूपाच्या पूर्व प्रवेशद्वारापासून मिळविला होता आणि सोसायटीमधील पंडित राम गोविंद ह्यांनी त्याचे वाचन करून जेम्सने त्याचे भाषान्तर केले होते. लेखात असे लिहिले होते की राजा चन्द्रगुप्ताच्या प्रसादाने ’अमुक’ नावाच्या कोणा व्यक्तीच्या पुत्राने श्रमणकांसाठी भूमि, पाच विहार आणि २५ दिनार इतके धन दान म्हणून दिले होते. एव्हांना गुप्त घराण्याचे चित्र दिसू लागलेले असल्याने हा चन्द्रगुप्त म्हणजे गुप्त वंशातील दुसरा चन्द्रगुप्त हे कळले, गुप्त घराणे बौद्ध होते काय असा संशयही निर्माण झाला पण कालान्तराने तो निवळला आणि गुप्त राजे जरी वैदिक परंपरेतील असले तरीही ते बौद्ध धर्मालाही आश्रय देत होते असे स्पष्ट झाले. ह्या लेखाशिवाय कॅ. स्मिथ ह्यांनी क्र. ३ ते २५ असे क्रमांक दिलेल्या २३ छोटया लेखांचे ठसेही पाठविले होते. हे छोटे लेख सांची स्तूपाभोवतालच्या सुशोभित कुंपणवजा भिंतीच्या अवशेषांमधून उचललेले होते आणि त्यांवरून अखेर जेम्सला ब्राह्मी लिपीची अखेरची किल्ली सापडली. त्यांपैकी क्र. १० ते क्र. १४ नमुन्यासाठी येथे दाखवीत आहे.*


हे कसे घडले हे त्याच्याच 

शब्दांत (JASB Vol VI, 1837, पृ. ४६०-६१.)

*✍🏻संकलन,अभिवादक,*

*👉द्रौपदीपुत्र दीपक धाकु गायकवाड*

*🗣️संविधान साक्षरता अभियान*

*👮‍♀️दक्ष मुंबईकर समिती-DMS


Post a Comment

0 Comments