लांजा – रत्नागिरी | JPN NEWS : लांजा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येणार असून, या महत्त्वपूर्ण वास्तूच्या उभारणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. तसेच विकासकामांसाठी निधीची कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही, अशी ग्वाही लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी दिली. लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीण यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष यशवंत जाधव तसेच सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विद्यमान स्मारक भवन बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. महामार्ग रुंदीकरणाच्या प्रक्रियेत या वास्तूवर निष्कासनाची कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून स्मारक भवनाला या कारवाईतून वाचविण्यात यश मिळवले. या प्रयत्नांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आमदार प्रमोद जठार आणि त्यानंतर तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.आता या ठिकाणी आधुनिक, आकर्षक आणि समाजासाठी उपयुक्त अशा स्वरूपात नवीन स्मारक भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणारी आदर्श वास्तू उभी करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, ग्रामीण अध्यक्ष संतोष जाधव, नगरसेविका मधुरा लांजेकर, ग्रामीण सचिव सचिन जाधव, माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांच्यासह मंडळाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लांजा तालुक्यातील बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास लवू कांबळे, व्ही. के. इस्वलकर, रघुवीर खिनगिनकर, सत्यवान पावस्कर, महादेव जाधव, भिकाजी देवधेकर, अनिरुद्ध कांबळे, एस. एन. कांबळे, सिद्धार्थ देवधेकर, आर. बी. कांबळे, अनोज जाधव, शंकर पवार, हनुमंत कदम, प्रशांत कदम, मारुती जाधव, संतोष कांबळे, रमेश कांबळे, प्रकाश कांबळे, गौतम कांबळे, सुभाष पवार, सुरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.भूमिपूजन सोहळ्यामुळे लांजा तालुक्यातील बौद्ध समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतर हे स्मारक भवन सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments