भाद्रपद शु. त्रयोदशी, शालिवाहन शके १९४८ अर्थात गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६
आंबेडकरी चळवळ दिन विशेष - भाग ३, वर्ष - ९ वे
भारतीय मातृसत्ताक संस्कृतीचा वारसा विचारधन
२४ सप्टेंबर १६७४ शाक्य पद्धतीने शिवराज्याभिषेक ३५२ वा वर्धापन दिन
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकण्यासाठी २४ सप्टेंबरची मोठी क्रांती
कुलवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जूनचा राज्याभिषेक हा इंग्रजी कॅलेंडरनुसार असून आपण केवळ हिंदू पंचांगातील तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच शिवराज्याभिषेक साजरा केला पाहिजे, असे सांगणारे मनोहर भिडे ताकाला जाऊन गाडग दडवित आहेत. शिवाजी महाराजांनी पहिला राज्याभिषेक नाकारून २४ सप्टेंबर १६७४ रोजी दुसरा शाक्त पंथी राज्याभिषेक करून घेतला, हे का सांगत नाहीत. परंतु विज्ञानवादी बहुजन तरुण पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेक का केला याचा शोध घेत आहे.
मुळात राज्याभिषेक करण्याचे कारण अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पिंगळे सारखे ब्राह्मण शिवाजी महाराजांना शूद्रराजा मानून त्यांच्या पंगतीला देखील बसत नव्हते. कारण ब्राह्मण परशुरामाने क्षत्रियांचा २१ वेळा निःपात केल्यामुळे पृथ्वीवर कोणी क्षत्रिय राहिलेला नाही. धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी ही तिन्ही लोकी श्रेष्ठ. त्यामुळे गुन्हेगार असला तरी त्याला शासन करता येत नव्हते.
म्हणून शिवाजी महाराज, अब्बाजी आवळे, जिजाऊ आणि संभाजी राजे यांनी राज्य कायदेशीर राज्यसंस्था धर्मसिद्धी, प्राणप्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि सार्वभौम राजासाठी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला. काशीच्या गागाभट्टाकडून राज्याभिषेक करून घेताना दानरुपी स्वराज्याची तिजोरी खाली केली. तरीही जातीवर गेलेल्या गागाभटाने क्षत्रिय राजासाठीचे वेदोयुक्त मंत्र न म्हणता शूद्र राजासाठी पुराणयुक्त मंत्र म्हणत शिवराय यांचा शूद्रराजा म्हणून राज्याभिषेक केला.
हा अपमान सहन न झाल्याने राजमाता जिजाऊ रायगड वरून थेट पाचाडला आल्या. आजारी पडलेल्या जिजाऊंनी राजसत्ता इतकीच धर्मसत्ता महत्वाची असल्याचे शिवबांना म्हणत अखेरचा प्राण सोडला.
आऊसाहेबांचा शब्द अंतिम मानून शिवाजी महाराजांनी केवळ ७९ दिवसांत शालिवाहन शक १५९६ शुद्ध आश्विन पंचमीला गुरुवार दि. २४ सप्टेंबर १६७४ रोजी शाक्तपंथी म्हणजेच तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक निश्चलपुरीचे गोसावी अर्थात बौद्ध भिक्षू यांच्याकडून करून घेतला.
तांत्रिक शब्दाचा अर्थ विशिष्ट सिद्धांत शास्त्र संप्रदाय होय. सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि विक्रमादित्य यांनी देखील राज्याभिषेक प्रसंगी गणराज्यात जातीच्या उच्चाटनासाठी खालच्या जातीच्या महिलेसोबत विवाह केला. दुसऱ्या राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी देखील वेरूळच्या अस्पृश्य महिलेशी विवाह केल्याची इतिहासात नोंद आहे.
शिवाजी महाराजांनी १६ व्या शतकात केलेली ही मोठी क्रांती आहे. संस्कृत पंडित शंभूराजे धर्म पंडितांच्या चुका दाखवत असल्याने धर्म पंडित भट, ब्राह्मण, पुरोहित यांची मोठी पंचायत होत होती. म्हणून त्यांना बदनाम करून स्वराज्यात बुद्धिभेद करीत पेशवाई आणली. त्या पेशव्याला शिवशाहीबद्दल आदर असता तर शिव राज्याभिषेकाचा शक बंद करून मोगलांचा फसली शक सुरू केला नसता.
महात्मा फुलेंनी अडगळीत पडलेल्या शिवशाहीला न्याय देण्यासाठी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती सुरू केली. शिवराज्याभिषेकाला न्याय मिळवून देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजीच सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांचा मुख्य उद्देश जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देऊन एक समतावादी समाज घडविणे.
परंतु ब्राह्मण आणि देव-धर्म अधीन असलेल्या मराठे-मावळे यांनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीला कधीच साथ दिली नाही आणि देण्याच्या आजही मानसिकतेचे नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि पुतळ्याची विटंबना सुरू आहे.
पर्यटनासाठी अनमोल ठेवा असलेले ३५० गडकिल्ले यांची जाणीवपूर्वक पडझड सुरू आहे. कारण प्रत्येक गडकिल्ले यांच्या पायथ्याला जगाचे आठवे आश्चर्य असलेली अनमोल बौद्ध लेणी आहेत. सह्याद्री पठारावरील ही ८०० बौद्ध लेणी आणि शिवाजी महाराजांचे ३५० गडकिल्ले पर्यटनासाठी खुले केले तर महाराष्ट्र सरकारला जगातून मोठा आर्थिक निधी मिळू शकतो. त्यासाठी शिवराय आणि भीमराव यांच्या विचाराचे सरकार सत्तेत येण्याची खरी गरज आहे.
शिवराज्याभिषेक अवमानच मूळ मनस्मृतीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड पायथा महाड येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी मनस्मृतीचे दहन करून शिवरायांच्या अवमानाचा बदला घेतला. हे मराठे मावळे यांच्या लक्षात कधी येणार आहे?
पुरोगामी २४ सप्टेंबरचा दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेक सोहळा आणि शिवशाहीला न्याय देत असताना मनोहर भिडे मात्र तारीख आणि तिथीचा वाद निर्माण करून बहुजन समाजाचा बुद्धिभेद करीत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेकाने ब्राह्मणी धर्म नाकारून केलेली मोठी क्रांती आहे. त्याला न्याय देण्यासाठी शिवशक्ती, भीमशक्तीने एकत्र आली तरच महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकेल.
वि.ता.क.; बौध्द विचारवंत, जेष्ठ साहित्यिक सन्मा. आनंद म्हस्के यांच्या 'दैनिक बहुजन सौरभ' नागपूर मधील दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसारित लेखातून साभार.
संकलन, प्रसारक
द्रौपदीपुत्र दीपक धाकु गायकवाड
संविधान साक्षरता अभियान
दक्ष मुंबईकर समिती DMS

Post a Comment
0 Comments