Type Here to Get Search Results !

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची IIT बॉम्बे येथे चौकशी कागदपत्रे, CCTV आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश; पोलिसांकडून तपासाचा आढावा



मुंबई : IIT बॉम्बेतील ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) गांभीर्याने दखल घेत IIT बॉम्बे येथे प्रत्यक्ष चौकशी केली. साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर जातीय भेदभाव व छळ झाल्याचे आरोप केले असून, या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्या नेतृत्वाखालील पथकाने IIT बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे, उपसंचालक, कुलसचिव, संबंधित प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 18 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या मिड-टर्म परीक्षेदरम्यान साहिलशी संबंधित घडलेल्या घटनांची, त्यानंतर झालेल्या चौकशीची तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेची माहिती आयोगाने घेतली.

परीक्षा केंद्र व हॉस्टलची पाहणी

आयोगाच्या पथकाने संबंधित विभाग, परीक्षा हॉल तसेच साहिल राहत असलेल्या हॉस्टलमधील खोलीची पाहणी केली. घटनेशी संबंधित माहिती असलेल्या विद्यार्थी, शिक्षक व संस्थेतील अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आयोगाने प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पुरावे, CCTV फुटेज, फॉरेन्सिक सामग्री आणि साक्षीदारांचे जबाब सुरक्षित ठेवून तपास यंत्रणेला उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

गुन्हे शाखेच्या तपासाचा आढावा

NCSCच्या पथकाने वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि तपास पथकाशी बैठक घेऊन FIR, पुराव्यांचे संकलन व संरक्षण, CCTV फुटेज तसेच साक्षीदारांच्या जबाबांबाबत तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात अनेक विद्यार्थी व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविल्याचे वृत्त आहे. तपासामध्ये परीक्षेच्या दिवशी घडलेल्या घटनांसह संबंधित इतर बाबींची चौकशी केली जात आहे.

कुटुंबीयांचे म्हणणे आयोगाने ऐकून घेतले

आयोगाने साहिलच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कुटुंबीयांनी आयोगाकडे लेखी तक्रारही सादर केली आहे. कुटुंबीयांनी केलेल्या जातीय भेदभाव व छळाच्या आरोपांची चौकशी सुरू असून, अंतिम निष्कर्ष तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

NCSCने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संविधान व कायद्यानुसार मिळणाऱ्या संरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, समानता, भेदभावमुक्त वातावरण आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा यावर भर दिला आहे.

तपासाकडे देशाचे लक्ष

साहिल वाकोडे प्रकरणामुळे IIT बॉम्बेतील विद्यार्थी कल्याण, तक्रार निवारण व्यवस्था आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. IIT बॉम्बेनेही या प्रकरणातील परिस्थिती अधिकृत तपासाच्या अधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील तपासात उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि संबंधित सर्व बाबींच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments