घाटकोपर, मुंबई - यंदाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका घाटकोपर परिसरात अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पडल्या असून यासाठी घाटकोपर पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यंदा घाटकोपर परिसरातील अनेक गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डिजेचा वापर पूर्णपणे टाळला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, शांततेत आणि शिस्तीत विसर्जन मिरवणुका काढून मंडळांनी सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण घालून दिले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटकोपर पोलिसांनी केलेले काटेकोर नियोजन, अथक परिश्रम आणि दाखवलेला संयम यामुळेच हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विशेष बाब म्हणजे यंदा पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळे यांच्यातील समन्वय अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी राहिला. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळांनीही समाधान व्यक्त केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल घाटकोपरमधील अनेक प्रमुख सामाजिक व सार्वजनिक कार्यकर्ते लवकरच मा. पोलीस अतिरिक्त आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करणार असल्याची माहिती कामगार नेते रमेश मारुती जाधव, अध्यक्ष - श्रमिक भारतीय युनियन यांनी दिली.
"शांतता, शिस्त, सामाजिक ऐक्य आणि पोलीस-मंडळ समन्वय हीच घाटकोपरची खरी ओळख आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे आभार," असे आवाहन रमेश जाधव यांनी केले आहे.
— सम्यक टाइम्स, घाटकोपर

Post a Comment
0 Comments