Type Here to Get Search Results !

गव्हाण विद्यालयात ‘फटाकेमुक्त दिवाळी’ अभियान उत्साहात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश; फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी पुस्तकांच्या खरेदीचे आवाहन



गव्हाण, दि. २२ ऑक्टोबर २०२६ :

दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज, गव्हाण येथे ‘फटाकेमुक्त दिवाळी’ अभियान राबविण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या जे. एस. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता अकरावी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मू koलन समितीच्या (महा अंनिस) कार्यकर्त्या तसेच पर्यावरण विषयाच्या अध्यापिका सौ. के. एम. तांडेल यांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण, तसेच त्याचे मानवी आरोग्य, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुपक्ष्यांवर होणारे दुष्परिणाम यांविषयी पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

५०० रुपयांच्या नोटेच्या प्रयोगातून पैशाच्या अपव्ययाची जाणीव

या अभियानातील एका विशेष कृतीने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांना ५०० रुपयांची नोट दाखवून ती जाळण्यास सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांनी नोट जाळण्यास स्पष्ट नकार दिला. या कृतीच्या माध्यमातून फटाक्यांवर खर्च होणारा पैसा काही क्षणांत धुरात मिसळत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

फटाक्यांवर अनावश्यक खर्च करण्याऐवजी त्या पैशातून पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. या उपक्रमातून पैशाचा योग्य विनियोग आणि पर्यावरणाप्रती सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण असला, तरी तो साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे निर्माण होणारे प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, अनेक विद्यार्थ्यांनी यंदा फटाके न वाजवता दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमाला ज्युनियर कॉलेजचे विभागप्रमुख श्री. उगले सर, श्री. जे. डी. सोनटक्के आणि सौ. अर्चना पाटील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.


Post a Comment

0 Comments