मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या जतन व संवर्धनासाठी सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे या वास्तूंच्या जतन व संवर्धनाची कामे सुनियोजित, दर्जेदार आणि त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी असावीत, असे निर्देश अण्णा बनसोडे यांनी बैठकीत दिले.
पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली. या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन केल्यामुळे पुढील पिढ्यांना बाबासाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य समजून घेण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी मोठी मदत होईल.
ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीनेही या वास्तूंना विशेष महत्त्व असल्याने त्यांच्या संवर्धनाची कामे करताना वास्तूंचे मूळ स्वरूप, ऐतिहासिक संदर्भ आणि दर्जा यांचा विचार करावा. यासाठी संबंधित सर्व विभाग आणि संस्थांनी परस्पर समन्वयातून कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही अण्णा बनसोडे यांनी दिल्या.
अधिकारी व पदाधिकारी उपस्थित
बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव पु. प्र. साबणे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, तसेच चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments