Type Here to Get Search Results !

शिक्षणातील जात-वर्ग-स्त्रीदास्य नष्ट करण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ परिषद



 पनवेल, दि. १५ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रातील तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेसमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पनवेल येथे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत जनसेवा हॉल, सेक्टर १३, खांदा कॉलनी, पनवेल येथे होणार आहे.


महाराष्ट्रात सरकारी प्राथमिक शाळांच्या समायोजनाच्या नावाखाली अनेक शाळा बंद होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. तसेच शिक्षकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावे लागणे आणि शिक्षणव्यवस्थेवरील वाढता आर्थिक भार यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.


‘आज शाळा वाचवली, तरच भविष्य वाचेल’ या भूमिकेतून विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन शिक्षणाचा प्रश्न समजून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षणातील जात, वर्ग आणि स्त्रीदास्य नष्ट करून सर्वांसाठी समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.


परिषदेचे आयोजन शाळा वाचवा, शिक्षण वाचवा परिषद, पनवेल यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, स्त्रीमुक्ती संघटना, शिवराज्य प्रतिष्ठान संघटना तसेच संविधानप्रेमी नागरिक, पनवेल (संविधान कट्टा) या संघटनांचा सहभाग आहे.


परिषदेसाठी मनोगर तांडेळ, महेंद्र नाईक, अनिता कोलते, विजय जाधव, सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रवीण जठार, अरविंद लोहार, बी. बी. भैकेरे आणि तुषार सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.


स्थळ : जनसेवा हॉल, सेक्टर १३, खांदा कॉलनी, पनवेल – ४१०२०६

वेळ : दुपारी ३ ते ६

दिनांक : २० सप्टेंबर २०२६


शिक्षण वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments